Breaking News

अहिल्यानगरमध्ये फरार व पाहिजे आरोपींविरोधात विशेष मोहीम

 





स्थानिक गुन्हे शाखेकडून ४ फरार व ४ पाहिजे आरोपींचा शोध; तिघांचे जामीन आदेश, एका आरोपीच्या मृत्यूची नोंद

अहिल्यानगर, दि. ३ ऑक्टोबर २०२६ : राज्यातील फरार व पाहिजे आरोपींची संख्या कमी करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांकडून १ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यात पोलिसांनी कारवाईला वेग दिला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेने २ ऑक्टोबर रोजी चार फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेऊन त्यांना संबंधित पोलीस ठाण्यात हजर केले. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनांनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी विशेष पथकाची नियुक्ती केली होती.

या पथकाने जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेत कारवाई केली. त्यामध्ये नेवासा पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील कुणाल बापू पवार, कोतवाली पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील शिवाजी सोन्याबापू साबळे व गणेश मधुकर झेंडे, तसेच पारनेर पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील अनिल रतन येणारे यांना संबंधित पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.

याशिवाय तोफखाना पोलीस ठाण्याशी संबंधित अक्षय बाबुराव धनवे, ऋतीक तुळशीराम गायकवाड आणि निखील अजय साळवे या तीन पाहिजे आरोपींचे जामीन आदेश पोलिसांकडे सादर करण्यात आले.

तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील संतोष बाबुराव सोनवणे हा आरोपी मयत असल्याने त्याचे मृत्यू प्रमाणपत्र संबंधित पोलीस ठाण्यात सादर करण्यात आले.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली केली. विशेष मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेण्याची कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

#अहिल्यानगर #अहिल्यानगरपोलीस #फरारआरोपी #पाहिजेआरोपी #स्थानिकगुन्हेशाखा #LCB #महाराष्ट्रपोलीस #पोलीसकारवाई #आपलंसत्यअहिल्यानगर


No comments

Note: Only a member of this blog may post a comment.