Breaking News

तरुणाचा हात तोडण्याच्या प्रकरणात आणखी दोन साथीदारांना अटक

 


जामखेड : जामखेड शहरातील तरुणाचा हात तोडण्याच्या प्रकरणात जामखेड पोलिसांनी आणखी दोन संशयित साथीदारांना अटक केली आहे. या कारवाईमुळे प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे.

दिनांक १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास जामखेड पोलीस स्टेशन हद्दीतील माजी नगरसेवकाचा भाऊ राहुल हिरामण अंधारे (वय ३४, रा. कान्होपात्रानगर, ता. जामखेड) याच्यावर जीवघेणा हल्ला करून त्याचा हात तोडल्याची घटना घडली होती. या घटनेप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७०२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०९(१), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याच्या तपासादरम्यान तपासी अधिकारी सपोनि अजित मोरे यांनी अटक आरोपींकडे चौकशी केली. चौकशीत आरोपींनी मागील भांडणाच्या रागातून गणेश प्रभाकर चव्हाण (वय ३०, रा. सावरगाव, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) आणि वसीम मुस्तफा शेख (वय ३३, रा. डोऱंगळी, ता. आष्टी, जि. बीड) या दोघांसह कट रचल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी आष्टी तालुक्यातील चिंचपूर गावातून गणेश प्रभाकर चव्हाण आणि वसीम मुस्तफा शेख यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्यानंतर दोघांनाही सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, पोलीस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर आणि पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित मोरे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव, पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर बेलकर, गणेश साने, दत्तू बेलकर आणि प्रकाश जाधव यांनी सहभाग घेतला. प्रकरणाचा पुढील सखोल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित मोरे करीत आहेत.

— आपलं सत्य अहिल्यानगर

#जामखेड #जामखेडपोलीस #अहिल्यानगर #गुन्हेगारी #पोलीसकारवाई

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.