Breaking News

सीएम पोर्टलवरील तक्रारींच्या निवारणासाठी २१ दिवसांची मुदत अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे निर्देश; दीपक पाचपुते यांच्या तक्रारीनंतर कार्यवाही

 


अहिल्यानगर : सीएम पोर्टलवर प्राप्त होणाऱ्या नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निवारण करण्यासाठी अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयाने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. प्रत्येक पोलीस उपविभाग व पोलीस ठाण्याला स्वतंत्र लॉगिन आयडी देणे, संबंधित विभागांची जबाबदारी निश्चित करणे तसेच अधिकृत शासकीय ई-मेल व संपर्क माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अर्जशाखेने दिली आहे.

यासंदर्भात पोलीस अधीक्षक कार्यालयाने कक्ष क्र. ३(२)/सीएम पोर्टल/५६९९९/२०२६, दिनांक ७ ऑक्टोबर २०२६ रोजी दीपक पाचपुते यांना सूचनापत्र दिले आहे. प्राप्त तक्रारींचे २१ दिवसांच्या आत निराकरण करण्याच्या सूचना सर्व संबंधित विभाग व पोलीस ठाण्यांना देण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

तसेच सीएम पोर्टलवरील तक्रारींचा दरमहा आढावा घेऊन त्याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केला जात असल्याचेही कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

तक्रारीनंतर निर्देशांची अंमलबजावणी

दीपक पाचपुते यांनी सादर केलेल्या नियमावलीनुसार तक्रार निवारण प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक निर्देश निर्गमित करून ते सर्व पोलीस ठाण्यांना कळविण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक कार्यालयाने पत्रातून स्पष्ट केले आहे. मात्र, संबंधित अर्ज दप्तरी दाखल करण्यात येत असल्याचेही पत्रात नमूद आहे.

त्यामुळे आता या निर्देशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत होते, तसेच नागरिकांच्या तक्रारींचे २१ दिवसांच्या मुदतीत प्रभावी आणि समाधानकारक निराकरण होते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

केवळ निर्देश नव्हे, प्रभावी अंमलबजावणी अपेक्षित

सीएम पोर्टलवरील तक्रारींचे निवारण केवळ पोर्टलवरील स्थिती बदलण्यापुरते मर्यादित न राहता, तक्रारीतील मूळ मुद्द्यांची योग्य चौकशी होणे आणि तक्रारदाराला समाधानकारक निर्णय मिळणे महत्त्वाचे आहे.

२१ दिवसांची कालमर्यादा प्रभावीपणे राबविण्यासोबतच संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केल्यास तक्रार निवारण प्रक्रियेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढण्यास मदत होऊ शकते.

संदर्भ : पोलीस अधीक्षक कार्यालय, अहिल्यानगर यांचे दिनांक ०७/१०/२०२६ रोजीचे सूचनापत्र.

#अहिल्यानगर #CMPortal #पोलीस #तक्रारनिवारण #दीपकपाचपुते #अहिल्यानगरपोलीस #जनतेचातक्रारी #पारदर्शकता

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.