Breaking News

बहुचर्चित सिस्पे घोटाळ्यात मोठी कारवाई! ठेवीदारांची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात श्रीगोंदा येथील दशरथ रोडे याला गव्हाणवाडी फाटा परिसरातून ताब्यात; पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

 



अहिल्यानगर | प्रतिनिधी


बहुचर्चित सिस्पे घोटाळा प्रकरणात ठेवीदारांची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. दशरथ विठ्ठल रोडे (वय ५१, रा. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. २२ ऑक्टोबर रोजी गव्हाणवाडी फाटा परिसरातून ही कारवाई करण्यात आली.


श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६७३/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(२), ३१६(५), ३१८(२), ३१८(४), ३(५) तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण) अधिनियम, १९९९ मधील कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातील आर्थिक फसवणुकीचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.


या गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडून स्थानिक गुन्हे शाखेला माहिती देण्यात आली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस अंमलदार गणेश लोंढे, रोहित मिसाळ, प्रताप देवकाते आणि फुरकान शेख यांचे पथक नियुक्त केले.


दरम्यान, पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, संशयित आरोपी दशरथ रोडे हा श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणवाडी फाटा परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शोधमोहीम राबवून रोडे याला ताब्यात घेतले.


ताब्यात घेतलेल्या आरोपीला पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे हजर करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे.


पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई


अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

#सिस्पेघोटाळा #अहिल्यानगर #श्रीगोंदा #स्थानिकगुन्हेशाखा #आर्थिकगुन्हेशाखा

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.