Breaking News

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

 


पशुधनाची अट हटवली; पाण्याची उपलब्धता असल्यास वर्षातून एकापेक्षा अधिक वेळा लाभाची संधी

अहिल्यानगर | प्रतिनिधी

राज्यातील कमी पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुपालक शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सन २०२६-२७ या वर्षासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या वैरण उत्पादन कार्यक्रमातील चारा बियाणे व ठोंबे वाटपाच्या अटी व शर्ती शिथिल करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. याबाबत पशुसंवर्धन विभागाने १४ ऑक्टोबर २०२६ रोजी शासन निर्णय जारी केला आहे.

राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, पशुधनासाठी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता वाढविणे आणि संभाव्य चारा टंचाईवर मात करणे आवश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने वैरण उत्पादनाला चालना देण्यासाठी योजनेच्या लाभाच्या अटींमध्ये बदल केला आहे.

तीन ते चार पशुधनाची अट शिथिल

९ मार्च २०२६ च्या शासन निर्णयानुसार वैरण उत्पादन कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी वैयक्तिक लाभार्थ्याकडे स्वतःचे किमान तीन ते चार पशुधन असणे आवश्यक होते. मात्र, सध्याची दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेऊन ही अट सन २०२६-२७ या वर्षापुरती शिथिल करण्यात आली आहे.

त्यामुळे चारा उत्पादन करण्यास इच्छुक असलेल्या अधिकाधिक पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

वैयक्तिक शेतकऱ्यांना ₹४ हजार, गटांना ₹२० हजारांपर्यंत अनुदान

योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांना एक हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत १०० टक्के अनुदानावर ₹४ हजार किमतीचे चारा बियाणे उपलब्ध करून दिले जाते.

तर शेतकरी समूह गटांना पाच हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत १०० टक्के अनुदानावर ₹२० हजार किमतीचे चारा बियाणे देण्यात येते.

वर्षातून एकापेक्षा अधिक वेळा लाभाची संधी

यापूर्वी या योजनेचा लाभ वर्षातून एकदाच घेता येत होता. सुधारित निर्णयानुसार, चारा उत्पादनासाठी आवश्यक पाणीसाठा उपलब्ध असल्यास पात्र वैयक्तिक लाभार्थी तसेच शेतकरी समूह गटांना वर्षातून एकापेक्षा अधिक वेळा चारा बियाण्यांचा लाभ घेता येणार आहे.

मात्र, प्रथमच लाभ घेण्यासाठी मागणी करणारा पाणीसाठा उपलब्ध असलेला अन्य पात्र अर्जदार नसल्यासच पुनःलाभ देण्यात येणार आहे.

पाण्याची उपलब्धता तपासणी बंधनकारक

ही विशेष सवलत काही अटींच्या अधीन राहणार आहे. संबंधित शेतकरी किंवा शेतकरी समूह गटाकडे चारा उत्पादनासाठी आवश्यक पाणी उपलब्ध असल्याची खातरजमा करून संबंधित उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग यांनी प्रमाणित करणे आवश्यक राहणार आहे.

तसेच योजनेचा प्रथमच लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अन्य पात्र अर्जदारांची मागणी नसल्याची खातरजमा करणेही आवश्यक राहणार आहे. ही शिथिलता केवळ सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी लागू राहणार आहे.

चारा टंचाईवर मात करण्यास मदत

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता वाढविणे, स्थानिक पातळीवर वैरण उत्पादनाला चालना देणे आणि पशुपालक शेतकऱ्यांना मदत करणे, या उद्देशाने शासनाचा हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

विशेषतः पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांना चारा उत्पादनाच्या अधिक संधी मिळणार असून, संभाव्य चारा टंचाईची तीव्रता कमी करण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

अहिल्यानगरच्या पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा

अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांमधील संबंधित योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र शेतकरी व पशुपालकांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.