चारा टंचाईवर मात करण्यासाठी अहिल्यानगर ग्रामीण तालुक्यात नियोजन २१ ऑक्टोबरला तालुक्यातील सर्व गावांत ग्रामसभा; VBG-RAMG योजनेंतर्गत चारा लागवडीसाठी इच्छुक शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन
अहिल्यानगर : आगामी काळात चारा टंचाईची संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन अहिल्यानगर (ग्रामीण) तालुक्यात चारा लागवडीचे नियोजन करण्यात येत आहे. विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान (ग्रामीण) अर्थात VBG-RAMG योजनेंतर्गत चारा लागवडीची कामे हाती घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
या अनुषंगाने २१ ऑक्टोबर रोजी तालुक्यातील सर्व गावांमध्ये ग्रामसभांचे आयोजन करण्यात येणार आहे. चारा लागवडीसाठी इच्छुक वैयक्तिक शेतकऱ्यांनी ग्रामसभांना उपस्थित राहून योजनेची माहिती घ्यावी आणि उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे.
चारा टंचाईच्या संभाव्य परिस्थितीवर वेळीच उपाययोजना करण्याच्या दृष्टीने १२ ऑक्टोबर रोजी तहसीलदार, अहिल्यानगर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीस तालुका कृषी अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी, सहाय्यक गटविकास अधिकारी तसेच सर्व मंडळाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत आगामी काळातील चारा टंचाईची शक्यता लक्षात घेऊन चारा लागवडीसाठी आवश्यक नियोजन करण्यावर भर देण्यात आला. VBG-RAMG योजनेंतर्गत चारा लागवडीची कामे करण्यास इच्छुक वैयक्तिक शेतकऱ्यांना योजनेची माहिती मिळावी आणि त्यांना या कामात सहभागी होण्याची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी गावपातळीवर व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
त्यानुसार २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रामसभांमध्ये VBG-RAMG योजनेंतर्गत चारा लागवडीच्या कामांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच या उपक्रमाची व्यापक प्रसिद्धी करून अधिकाधिक इच्छुक शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचविण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
#अहिल्यानगर #चारा_टंचाई #चारा_लागवड #VBG_RAMG #ग्रामसभा #शेतकरी #पशुपालन #दुष्काळ #आपलंसत्यअहिल्यानगर

No comments
Note: Only a member of this blog may post a comment.