अहिल्यानगर LCB कारवाई: ९ ठिकाणी छापे, २.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त
अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध धंद्यांवर एलसीबीचा धडाका! एका दिवसात ९ ठिकाणी छापे; २ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त
दारूविक्री आणि जुगार अड्ड्यांवर पोलिसांची कारवाई; नऊ गुन्हे दाखल, श्रीरामपूरमधील जुगार कारवाईत सर्वाधिक १ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त
अहिल्यानगर | प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) जोरदार मोहीम राबवली आहे. एकाच दिवशी जिल्ह्यातील विविध नऊ ठिकाणी छापे टाकून अवैध दारूविक्री आणि जुगारप्रकरणी एकूण नऊ गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत तब्बल २ लाख २४ हजार ७०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. श्रीरामपूर शहरातील जुगार कारवाईत सर्वाधिक १ लाख ८१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती संकलित करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पाच स्वतंत्र पथके तयार करून कारवाईसाठी रवाना केली.
२२ नोव्हेंबर रोजी जिल्हाभरात छापेमारी
दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी या पथकांनी पारनेर, कोतवाली, पाथर्डी, श्रीगोंदा आणि श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध दारूविक्री आणि जुगार अड्ड्यांवर छापे टाकले.
कुठे किती मुद्देमाल जप्त?
- पारनेर : १४ हजार १६५ रुपये.
- कोतवाली : दारूविक्रीप्रकरणी ८ हजार रुपये.
- पाथर्डी : तीन कारवायांत १४ हजार १६० रुपये.
- श्रीगोंदा : १ हजार ८० रुपये.
- श्रीरामपूर शहर : दारूविक्रीप्रकरणी ५ हजार १८० रुपये.
- कोतवाली : जुगारप्रकरणी १ हजार २० रुपये.
- श्रीरामपूर शहर : जुगारप्रकरणी १ लाख ८१ हजार १०० रुपये.
या मोहिमेत अवैध दारूविक्रीचे सात, तर जुगाराचे दोन असे एकूण नऊ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
एलसीबीच्या पाच पथकांची संयुक्त कारवाई
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली. पाच स्वतंत्र पथकांतील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला.
जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात एकाच दिवशी झालेल्या या मोठ्या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मात्र, अशा अवैध धंद्यांवर कायमस्वरूपी आळा बसण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने कारवाई होणे अपेक्षित आहे.
— रवीकुमार शिंदे
मुख्य संपादक
आपलं सत्य अहिल्यानगर
सत्याच्या शोधात… बातमी विश्वासाची!
अहिल्यानगर पोलीस, LCB कारवाई, अवैध दारूविक्री, जुगार अड्डे, श्रीरामपूर पोलीस, पाथर्डी, पारनेर
पेपर टाईप: क्राईम न्यूज | जिल्हा वार्ता


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.