Breaking News

तुकाई उपसा सिंचन योजनेतून कर्जतच्या १९ गावांतील

 

 ५९९ हेक्टर शेतीला मिळणार शाश्वत पाण्याचा आधार

२७ तलाव भरणार; ६६ कोटींच्या योजनेला गती, सौरऊर्जेमुळे वीजबिलाचा भार नाही | मिरज

कर्जत तालुक्यातील तुकाई उपसा सिंचन योजनेच्या पंपगृह कामाच्या उद्घाटन कार्यक्रमात सभापती राम शिंदे आणि मंत्री संजय राठोड

गावच्या भैरवनाथ उपसा सिंचन सर्वेक्षणासाठी ८६ लाख मंजूर

अहिल्यानगर | प्रतिनिधी

कर्जत तालुक्यातील दुष्काळी भागाला शाश्वत सिंचनाचा आधार देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या तुकाई उपसा सिंचन योजनेच्या पंपगृह कामाचा उद्घाटन सोहळा मौजे शिंदे येथे उत्साहात पार पडला. या योजनेमुळे कर्जत तालुक्यातील १९ गावांमधील सुमारे ५९९ हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ मिळणार असून, २७ तलावांमध्ये पाणी उपलब्ध होणार आहे. सौरऊर्जेवर आधारित यंत्रणेमुळे शेतकऱ्यांना वीजबिलाचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार नसल्याने ही योजना दुष्काळी भागासाठी वरदान ठरेल, असा विश्वास विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर, मुख्य अभियंता हरिभाऊ गीते, कार्यकारी अभियंता पांडुरंग गायसमुद्रे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

६६ कोटींच्या योजनेतून २७ तलावांना पाणी

प्रा. राम शिंदे यांनी सांगितले की, शेतीचे उत्पादन वाढविणे, पीक नुकसानीची जोखीम कमी करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे यासाठी तुकाई उपसा सिंचन योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या या उपसा सिंचन योजनेसाठी ६६ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

योजनेतून २७ तलाव भरले जाणार असून, ५९९ हेक्टर शेतीला सिंचन सुविधा मिळणार आहे. पाण्याचे व्यवस्थापन पाणी वापर संस्थेमार्फत केले जाणार आहे. सौरऊर्जेचा वापर केल्यामुळे सिंचनासाठी वीज खर्चाचा भार कमी होणार असून शेतकऱ्यांना पिकांचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.

फळबाग लागवड व उत्पन्नवाढीला चालना

सिंचन सुविधा उपलब्ध झाल्यामुळे पारंपरिक शेतीबरोबरच फळबाग लागवड आणि अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे वळण्याची संधी निर्माण होईल. शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी पाण्याचे योग्य व्यवस्थापन आणि उपलब्ध जलसाठ्यांचे संवर्धन महत्त्वाचे असल्याचे सभापतींनी सांगितले.

परिसरातील पाझर तलावांच्या बळकटीकरणासाठीही प्रयत्न सुरू असून, त्यासंदर्भातील प्रस्ताव १५ दिवसांत तयार करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

जलयुक्त शिवार ३.० मधून १८ हजार गावे जलसमृद्ध करण्याचे उद्दिष्ट

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी जलसंधारणाची कामे लोकसहभागातून लोकचळवळ म्हणून उभी राहण्याची गरज व्यक्त केली. जलयुक्त शिवार ३.० योजना लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असून, राज्यातील १८ हजार गावांमध्ये विविध जलसंधारण कामे करून ही गावे जलसमृद्ध करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे, असेही मंत्री राठोड यांनी नमूद केले.

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शेतीसह विविध उपक्रम

शेतजमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शेती’ योजना महत्त्वपूर्ण ठरत आहे. धरणांमधील गाळ काढल्यामुळे जलसाठ्यांची क्षमता वाढण्यास मदत होणार असून, हा गाळ शेतीसाठी वापरता येणार आहे.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेची कामे राज्यातील १ हजार ५२० गावांमध्ये सुरू आहेत. जलतारा प्रकल्प, नाला रुंदीकरण व खोलीकरण, बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून पावसाचे पाणी अडविणे व जमिनीत जिरविण्यावर भर दिला जात आहे.

मिरजगावच्या भैरवनाथ उपसा सिंचन सर्वेक्षणासाठी ८६ लाख मंजूर

कर्जत तालुक्यातील सिंचन सुविधांचा विस्तार करण्यासाठी मिरजगाव येथील भैरवनाथ उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासाठी ८६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमुळे सर्वेक्षण आणि पुढील कार्यवाहीला गती मिळणार असून, भविष्यात परिसरातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

तुकाई उपसा सिंचन योजना आणि भैरवनाथ उपसा सिंचन योजनेच्या पुढील कार्यवाहीमुळे कर्जत तालुक्यातील शेतीला पाण्याचा आधार मिळण्यास मदत होणार असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या दृष्टीने या प्रकल्पांकडे महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.


#कर्जत #तुकाईउपसासिंचन #रामशिंदे #शेतकरी #आपलंसत्यअहिल्यानगर

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.