Breaking News

काष्टीत कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या ६२ गोवंशीय जनावरांची सुटका! स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; २८ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त, तीन चारचाकी वाहने ताब्यात





अहिल्यानगर, दि. ८ नोव्हेंबर २०२६ :


श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवल्याची माहिती मिळालेल्या तब्बल ६२ गोवंशीय जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सुटका केली आहे. या कारवाईत तीन चारचाकी वाहनांसह एकूण २८ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी विशेष पथकाला अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.


८ नोव्हेंबर रोजी पथक श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना गोपनीय माहिती मिळाली की, फैजान उर्फ अबुझर अब्दुलहक कुरेशी (रा. खाटीक गल्ली, दौंड, जि. पुणे) याने काष्टी-दौंड महामार्गालगत संदिप पाचपुते यांच्या गोठ्याजवळ तसेच नवीन पेट्रोल पंपाच्या बांधकामाच्या संरक्षक भिंतीमागे गोवंशीय जनावरे बांधून ठेवली आहेत.


या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीगोंदा पोलिसांच्या मदतीने पंचांसमक्ष दोन्ही ठिकाणी छापे टाकले. यावेळी लहान-मोठ्या गायी, गोऱ्हे आणि कालवडी अशी एकूण ६२ गोवंशीय जनावरे आढळून आली. पोलिसांनी सर्व जनावरे ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली.


या कारवाईत ६२ गोवंशीय जनावरे आणि तीन चारचाकी वाहने असा एकूण २८ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १००७/२०२६ अन्वये महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९९५ (सुधारित २०१५) मधील कलम ५(अ), ५(ब), ९ तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियमातील कलम ३ व ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करीत आहेत.


ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव, पोलीस अंमलदार सोमनाथ झांबरे, भीमराव खर्से, अमृत आढाव, भाऊसाहेब काळे, प्रताप देवकाते, जालिंदर साखरे तसेच श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कौशलरामनिरंजन वाघ, पोलीस उपनिरीक्षक रसूल शेख, नंदकुमार भैलुमे, राहुल मोढळे आणि अरुण पवार यांच्या पथकाने केली.


६२ गोवंशीय जनावरांची सुटका झाल्याने गोवंश संरक्षणाच्या दृष्टीने या कारवाईचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.


प्रसिद्धीसाठी


रवी कुमार शिंदे

संपादक

आपलं सत्य अहिल्यानगर

विश्वसनीय • निष्पक्ष • तेज डिजिटल न्यूज

#BreakingNews #Ahilyanagar #Shrigonda #Kashti #GoVanshRakshan

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.