Breaking News

जामखेडमधील घरकुल लाभार्थ्यांचे अतिरिक्त ३५ हजार रुपये अनुदान रखडले; लाभार्थ्यांचा सवाल – पैसे कधी मिळणार? प्रधानमंत्री आवास योजनेतील प्रलंबित अनुदान तातडीने वितरित करण्याची मागणी; प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडावी

 

जामखेड, प्रतिनिधी :


जामखेड तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना बांधकामासाठी देय असलेले अतिरिक्त ३५ हजार रुपयांचे अनुदान अद्याप मिळाले नसल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. घरकुल बांधकाम पूर्ण करण्यासाठी या अनुदानाची प्रतीक्षा करणाऱ्या अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.


शासनाकडून घरकुल बांधकामासाठी अतिरिक्त अनुदानाची तरतूद करण्यात आली असताना प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यावर ही रक्कम कधी जमा होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.


जामखेड तालुक्यातील किती लाभार्थ्यांचे अनुदान प्रलंबित आहे? शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे का? निधी प्राप्त झाला असल्यास वितरणास विलंब का होत आहे? तसेच निधी उपलब्ध नसल्यास तो कधी प्राप्त होणार? याबाबत प्रशासनाने स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी होत आहे.


या संदर्भात पंचायत समिती जामखेडचे गटविकास अधिकारी तसेच जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे ई-मेलद्वारे निवेदन पाठवून प्रलंबित अनुदानाची सद्यस्थिती, लाभार्थ्यांची संख्या आणि अनुदान वितरणाची अपेक्षित तारीख कळविण्याची मागणी करण्यात येत आहे.


लाभार्थ्यांच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून पात्र लाभार्थ्यांचे प्रलंबित अतिरिक्त ३५ हजार रुपये अनुदान वितरित करावे, अशी मागणी 'आपलं सत्य अहिल्यानगर'च्या वतीने करण्यात येत आहे.


आपलं सत्य अहिल्यानगर

#प्रधानमंत्रीआवासयोजना #घरकुलयोजना #जामखेड #अहिल्यानगर #घरकुलअनुदान #आपलंसत्यअहिल्यानगर

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.