लाडकी बहीण योजनेचा आर्थिक भार अन् नमो शेतकरी योजनेला घरघर? शेतकऱ्यांचा सवाल!
नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते रखडले; योजना बंद होणार की काय? शेतकऱ्यांमध्ये चिंता!
लाडकी बहीण योजनेच्या आर्थिक भारामुळे शेतकऱ्यांच्या हक्काच्या निधीवर परिणाम होतोय का? पिंपरी निर्मळसह राज्यभरातून उपस्थित होतोय सवाल
अहिल्यानगर : केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सध्या हप्त्यांच्या विलंबामुळे चर्चेत आली आहे. योजनेचे दोन हप्ते अद्याप प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेतून पात्र लाभार्थ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र, हप्ते वेळेवर जमा होत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नियोजन करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च होत असताना नमो शेतकरी योजनेच्या निधीला विलंब का होत आहे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. लाडकी बहीण योजनेच्या आर्थिक भाराचा परिणाम शेतकऱ्यांच्या योजनेवर होत आहे का, याबाबतही ग्रामीण भागात चर्चा सुरू आहे.
पिंपरी निर्मळसह अहिल्यानगर जिल्ह्यातील आणि राज्यभरातील शेतकरी सरकारकडे प्रलंबित हप्त्यांच्या वितरणाची मागणी करत आहेत. शासनाने या योजनेबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी, प्रलंबित हप्ते तातडीने जमा करावेत आणि भविष्यातील हप्त्यांचे वेळापत्रक स्पष्ट करावे, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सुरू केलेली योजना प्रत्यक्षात वेळेवर लाभ देणार का? की हप्त्यांच्या प्रतीक्षेतच शेतकऱ्यांना राहावे लागणार? हा प्रश्न आता महत्त्वाचा ठरत आहे.
#नमो_शेतकरी #शेतकरी_सन्मान_निधी #पीएम_किसान #लाडकी_बहीण_योजना #शेतकरी


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.