Breaking News

ऊस उत्पादकांना योग्य भाव मिळावा यासाठी प्रशासनाचा पुढाकार; शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांमध्ये समन्वय बैठक

 



जिल्हाधिकारी कार्यालयात दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले; ऊसदराचे धोरण जाहीर करण्याची कारखानदारांना विनंती

अहिल्यानगर : जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला वाढीव व योग्य भाव मिळावा, या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ऊसदराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने समन्वयाची भूमिका घेतली असून, शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी आणि सहकारी साखर कारखान्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली.

या बैठकीत शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मांडल्या, तर सहकारी साखर कारखान्यांच्या पदाधिकाऱ्यांनी कारखान्यांची भूमिका स्पष्ट केली. दोन्ही बाजूंचे म्हणणे सविस्तरपणे ऐकून घेत ऊसदराच्या प्रश्नावर सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी सहकारी साखर कारखान्यांनी ऊसदरासंदर्भातील आपले धोरण स्पष्टपणे जाहीर करावे, अशी विनंती प्रशासनाच्या वतीने करण्यात आली.

शेतकरी आणि साखर कारखाने हे सहकार क्षेत्राचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. त्यामुळे या दोन्ही घटकांमध्ये संघर्षाऐवजी संवाद, चर्चा आणि समन्वयातून प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत ऊसदराच्या प्रश्नावर लवकरात लवकर योग्य तोडगा निघावा, अशी प्रशासनाची भूमिका आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा आणि सहकार क्षेत्रातील सलोखा कायम राहावा, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून समन्वयाचे प्रयत्न सुरू आहेत. आता या चर्चेतून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात किती वाढीव भाव पडतो, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

— पत्रकार रवीकुमार शिंदे
आपलं सत्य अहिल्यानगर

#ऊसदर #ऊसउत्पादकशेतकरी #शेतकरीआंदोलन #अहिल्यानगर #साखरकारखाना #आपलंसत्यअहिल्यानगर

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.