संत रोहिदास विकास केंद्राच्या बिलासाठी ७५ हजारांची लाच मागितल्याचा आरोप; समाजकल्याण निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात!
अहिल्यानगरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची सापळा कारवाई; संदीप फुंदे यांना ताब्यात घेतल्याची माहिती
अहिल्यानगर | प्रतिनिधी
अहिल्यानगरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी, १२ नोव्हेंबर रोजी मोठी कारवाई केली. संत रोहिदास विकास केंद्राच्या प्रलंबित बिलाच्या संदर्भात ७५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याच्या आरोपावरून समाजकल्याण कार्यालयातील समाजकल्याण निरीक्षक संदीप हरिभाऊ फुंदे यांच्याविरुद्ध एसीबीने सापळा कारवाई केली. या कारवाईदरम्यान संबंधित लोकसेवकाला सायंकाळी ४.२२ वाजता ताब्यात घेण्यात आल्याची माहिती एसीबीच्या प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आली आहे.
नेमके प्रकरण काय?
तक्रारदारांनी अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील मौजे केडगाव येथील सर्व्हे क्रमांक ४९/२ आणि ५०/१ येथे संत रोहिदास विकास केंद्र उभारण्याचे काम केले होते. या कामासाठी महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १३ फेब्रुवारी २०२४ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला होता.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, काम पूर्ण होऊनही सुमारे २५ लाख रुपयांचे बिल प्रलंबित होते.
७५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप
एसीबीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ५ नोव्हेंबर २०२६ रोजी समाजकल्याण निरीक्षक संदीप फुंदे यांनी तक्रारदारांना फोन करून कार्यालयात भेटण्यास सांगितले होते. त्यानंतर तक्रारदारांनी अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
या तक्रारीच्या अनुषंगाने १२ नोव्हेंबर रोजी समाजकल्याण कार्यालयात लाच मागणीची पडताळणी व सापळा कारवाई करण्यात आली. यावेळी ७५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे एसीबीच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.
तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया
या कारवाईनंतर संबंधित लोकसेवकाला सायंकाळी ४.२२ वाजता ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी अहिल्यानगर येथील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली आहे.
एसीबीच्या पथकाची कारवाई
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. सापळा पथकामध्ये पोलीस हवालदार संतोष, पोलीस हवालदार रवी निमसे, पोलीस कॉन्स्टेबल कराड आणि पोलीस हवालदार हारुण शेख यांचा समावेश होता.
या कारवाईस पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि अपर पोलीस अधीक्षक कविता फडतारे यांचे मार्गदर्शन लाभले.
आपलं सत्य अहिल्यानगरचा सवाल!
शासकीय कामे पूर्ण करूनही नागरिक, संस्था आणि कंत्राटदारांना आपल्या हक्काच्या बिलांसाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असतील, तर प्रशासकीय पारदर्शकतेचा प्रश्न निर्माण होतो. लाचेची मागणी होत असल्याच्या तक्रारींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. शासकीय कामे कोणत्याही आर्थिक देवाणघेवाणीशिवाय आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण होणे हीच सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.
बातमी विश्वासाची! निर्भीड | निष्पक्ष | विश्वासार्ह
मुख्य संपादक : रवीकुमार शिंदे आपलं सत्य अहिल्यानगर
#आपलं_सत्य_अहिल्यानगर #Ahilyanagar #ACB #भ्रष्टाचार #लाचलुचपत #रवीकुमारशिंदे

No comments
Note: Only a member of this blog may post a comment.