मनरेगा कुशल कामगारांची दोन वर्षांपासून देयके प्रलंबित; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रवीकुमार शिंदे यांची तक्रार
अहिल्यानगर जिल्ह्यातील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी व थकीत रक्कम तातडीने अदा करण्याची मागणी
अहिल्यानगर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील वैयक्तिक लाभाच्या विविध कामांवर प्रत्यक्ष काम केलेल्या कुशल कामगारांची सन २०२४ पासूनची देयके अद्याप प्रलंबित असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते रवीकुमार शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ई-मेलद्वारे सविस्तर तक्रार करून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
मनरेगा अंतर्गत विविध विकासकामांवर प्रत्यक्ष काम करूनही कुशल कामगारांना त्यांच्या मेहनतीचा मोबदला मिळालेला नसल्याने संबंधित कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सन २०२४ पासून देयके प्रलंबित राहिल्याने कामगारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
या प्रश्नाबाबत रवीकुमार शिंदे यांनी यापूर्वी ६ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र रोजगार हमी योजना आयुक्त कार्यालयाकडे ई-मेलद्वारे निवेदन पाठवले होते. त्यानंतर १६ सप्टेंबर रोजी स्मरणपत्र आणि ४ ऑक्टोबर रोजी अंतिम स्मरणपत्र पाठवूनही समाधानकारक लेखी कार्यवाही अहवाल प्राप्त झाला नसल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
याशिवाय अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा परिषद व मनरेगा कार्यालयाकडेही लेखी निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र अद्याप हा प्रश्न मार्गी लागलेला नसल्याने आता मुख्यमंत्री स्तरावरून हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत अहिल्यानगर जिल्ह्यात किती कुशल कामगारांची देयके प्रलंबित आहेत, एकूण किती रक्कम थकीत आहे, देयके रखडण्यामागील नेमकी कारणे काय आहेत आणि निधी उपलब्ध असूनही देयके का अदा करण्यात आलेली नाहीत, याची सविस्तर चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागवून प्रत्यक्ष काम केलेल्या कुशल कामगारांची प्रलंबित रक्कम त्यांच्या बँक खात्यात तातडीने जमा करण्यासाठी कालमर्यादा निश्चित करावी. देयके प्रलंबित ठेवण्यास जबाबदार असलेल्या अधिकारी व यंत्रणेची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कार्यवाही करावी, अशी मागणीही शिंदे यांनी केली आहे.
वारंवार निवेदने देऊनही प्रश्न सुटत नसल्याने आता मुख्यमंत्री कार्यालयाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि संबंधित विभागाला सात दिवसांत वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी रवीकुमार शिंदे यांनी केली आहे.
प्रत्यक्ष काम करणाऱ्या कुशल कामगारांना त्यांच्या कष्टाचा मोबदला मिळावा आणि प्रलंबित देयकांचा प्रश्न तातडीने निकाली निघावा, हीच या तक्रारीमागील प्रमुख भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
#मनरेगा #मनरेगा_कामगार #कुशलकामगार #प्रलंबितदेयके #कामगारांचाहक्क #रोजगारहमी_योजना #अहिल्यानगर #अहिल्यानगरबातम्या #देवेंद्रफडणवीस #मुख्यमंत्री #महाराष्ट्रशासन #मुख्यमंत्रीकार्यालय #शासकीययोजना #कामगारन्याय #रवीकुमारशिंदे #आपलंसत्यअहिल्यानगर


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.