Breaking News

अक्कलकोट येथून ३० व्या श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमेचे उत्साहात प्रस्थान!

 

२३६ दिवसांची परिक्रमा; महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यांतून होणार मार्गक्रमण

अक्कलकोट : ‘अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय’, ‘श्री अन्नपूर्णामाता की जय’ अशा जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३० व्या श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमेचे गुरुवार, दि. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथून मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात प्रस्थान झाले.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

गेल्या २९ वर्षांपासून मंडळाच्या वतीने श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमेचे आयोजन करण्यात येत असून, यंदा या परिक्रमेचे ३० वे वर्ष आहे. या परिक्रमेचा शुभारंभ श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे पुजारी प.पू. अण्णू महाराज पुजारी, वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे मुख्य पुरोहित मंदार महाराज मोहनराव पुजारी, श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे धनंजय महाराज पुजारी तसेच श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेशजी इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री स्वामी समर्थ पादुकांचे पूजन करून करण्यात आला.

महाप्रसादालय परिसरात पालखी पूजन झाल्यानंतर मंडळाच्या परिसरातील श्री शमी विघ्नेश गणेश मंदिर, श्री भवानी माता मंदिर आणि समाधी मठ येथे आरती करण्यात आली. त्यानंतर श्री मल्लिकार्जुन मंदिर व श्री खंडोबा मंदिरात आरती करून पालखी सोलापूरच्या दिशेने मार्गस्थ झाली.

ही पालखी परिक्रमा पुढील २३६ दिवस महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांमधून मार्गक्रमण करणार आहे. बुधवार, दि. ७ जुलै २०२७ रोजी या परिक्रमेचा समारोप तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत होणार आहे.

श्री स्वामी समर्थांच्या पादुकांच्या दर्शनाचा लाभ राज्यातील विविध भागांतील भाविकांना मिळणार असून, या परिक्रमेच्या माध्यमातून स्वामी समर्थांचा भक्तिमय संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचणार आहे.


#श्रीस्वामीसमर्थ #अक्कलकोट #स्वामीसमर्थपालखी #पालखीपरिक्रमा2026 #श्रीस्वामीसमर्थअन्नछत्रमंडळ #स्वामीसमर्थमहाराज #अवधूतचिंतन #गुरुदेवदत्त #अन्नपूर्णामाता #अक्कलकोटनगरी #३०वीपालखीपरिक्रमा #स्वामीभक्त #महाराष्ट्र #कर्नाटक #गोवा #धार्मिकसोहळा #आपलं_सत्य_अहिल्यानगर #ApalaSatyaAhilyanagar





No comments

Note: Only a member of this blog may post a comment.