संत नामदेव महाराजांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर ते घुमाण २,५०० किलोमीटर सायकल वारीचा शुभारंभ
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंढरपूर येथे प्रारंभ; पाच राज्यांतून प्रवास
पंढरपूर : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) अशी सुमारे २ हजार ५०० किलोमीटरची सायकल वारी सुरू करण्यात आली. या सायकल वारीचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंढरपूर येथे करण्यात आला.
संत नामदेव महाराजांचे विचार आणि संत साहित्याचा प्रसार करणारी ही सायकल वारी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.
पालखी सोहळा पत्रकार संघ, भागवत धर्म प्रसारक मंडळ, श्री नामदेव दरबार कमिटी, श्री क्षेत्र घुमाण (पंजाब), सायकल रायडर्स असोसिएशन आणि समस्त नामदेव शिंपी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२२ पासून संत शिरोमणी श्री नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारीचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा या उपक्रमाचे पाचवे वर्ष आहे.
२१ नोव्हेंबर रोजी सुरू झालेली ही रथयात्रा व सायकल वारी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि पंजाब या पाच राज्यांतून प्रवास करून १३ डिसेंबर रोजी श्री क्षेत्र घुमाण येथे पोहोचणार असून, तेथे सायकल वारीचा समारोप होणार आहे.
त्यानंतर रथयात्रा हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांतून प्रवास करीत २१ डिसेंबर रोजी पुन्हा श्री क्षेत्र पंढरपूर येथे दाखल होणार आहे.
या शुभारंभप्रसंगी मंत्री भरतशेठ गोगावले, आमदार राजू खरे, पालखी सोहळा पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष शंकर टेमघरे, उपाध्यक्ष सुभाष भांबुरे, सायकल रायडर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. सुभाष कोकणे यांच्यासह सायकल रायडर्स उपस्थित होते.


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.