बाल विवाह मुक्त भारत अभियानाचा अहिल्यानगर जिल्ह्यात शुभारंभ.
अहिल्यानगर : बालविवाह प्रतिबंध, महिला व बालकांचे संरक्षण आणि त्यांच्या हक्कांबाबत जनजागृती करण्यासाठी देशभर राबविण्यात येत असलेल्या ‘बाल विवाह मुक्त भारत अभियान’चा अहिल्यानगर जिल्ह्यात शुभारंभ करण्यात आला.
संयुक्त राष्ट्र महासभेने दरवर्षी २७ नोव्हेंबर हा दिवस बालविवाह व सक्तीचे विवाह निर्मूलन आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून घोषित केला आहे. यानिमित्त १८ ते २७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत देशभर अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत २० नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद अहिल्यानगर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित विभागप्रमुख व अधिकाऱ्यांना बाल विवाह मुक्त भारत अभियानाची शपथ देण्यात आली.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यात जनजागृतीपर कार्यक्रम, प्रतिज्ञा, रॅली, किशोर सभा, ग्रामसभा, ग्राम बाल संरक्षण समिती बैठका तसेच शाळा व महाविद्यालय स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
कार्यक्रमात बालविवाह प्रतिबंधक कायदा, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा, बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियान, चाइल्ड हेल्पलाइन १०९८, बाल संरक्षण यंत्रणा, बालमजुरी प्रतिबंध, बाल अत्याचार प्रतिबंध, वन स्टॉप सेंटर योजना, बाल संगोपन योजना, पिंक ई-रिक्षा, हुंडा प्रतिबंधक कायदा आणि महिला हेल्पलाइन १८१ आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
महिला व बालकांवरील हिंसाचार, अत्याचार, बालविवाह व बालमजुरी यांसारख्या समस्यांची माहिती संबंधित यंत्रणांना देणे, उपलब्ध कायदेशीर व संस्थात्मक मदत घेणे आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक कार्यपद्धती याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली.
महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी उपलब्ध हेल्पलाइन व संरक्षण यंत्रणांचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन संजय कदम, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, अहिल्यानगर यांनी केले.
आपलं सत्य अहिल्यानगर
संपादक : रवी कुमार शिंदे
#बालविवाहमुक्तभारत #अहिल्यानगर #महिलावबालविकास #बालसंरक्षण #जनजागृती


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.