Breaking News

सोलापूरात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई! गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करणारे वाहन पकडले; ३०.९१ लाखांचा मुद्देमाल जप्त

 



इचगाव टोलनाक्यावर धडक कारवाई; दोघांवर गुन्हा दाखल, एप्रिल ते ऑक्टोबरदरम्यान जिल्ह्यात १०.२२ कोटींचा मुद्देमाल जप्त

सोलापूर | प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यात गोवा राज्यनिर्मित विदेशी मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली आहे. मिरज-सोलापूर महामार्गावरील इचगाव टोलनाका, ता. मोहोळ येथे ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी केलेल्या कारवाईत गोवा बनावटीच्या विदेशी मद्यासह बिअर आणि टाटा कंपनीचे चारचाकी इंट्रा वाहन असा एकूण ३० लाख ९१ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोघांवर कारवाई करण्यात आली असून एक गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या कारवाईत एकूण २३८ बॉक्समधून ७५० मिली व १८० मिली क्षमतेच्या विदेशी मद्याच्या ३ हजार ८८८ बाटल्या, तसेच बिअरच्या २६४ बाटल्या जप्त करण्यात आल्या. यामध्ये २ हजार ६८ ब.लि. विदेशी मद्य आणि १३२ ब.लि. बिअरचा समावेश आहे.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख व पुणे विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांच्या निर्देशानुसार, सोलापूरच्या अधीक्षक भाग्यश्री पं. जाधव आणि उपअधीक्षक सौरभ बा. अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

सात महिन्यांत १,८२५ गुन्हे; १०.२२ कोटींचा मुद्देमाल जप्त

दरम्यान, १ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०२६ या सात महिन्यांच्या कालावधीत सोलापूर शहर व जिल्ह्यात अवैध हातभट्टी, देशी-विदेशी मद्य, परराज्यातील मद्य, बनावट मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधात मोठी मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेत एकूण १,८२५ गुन्हे नोंदविण्यात आले असून १,९२५ जणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ६ लाख ७२ हजार ८६६ लिटर रसायन, ४८ हजार ६९२.५ लिटर हातभट्टी दारू, ९ हजार ३३८.१७ ब.लि. परराज्यातील मद्य, ३ हजार ९२६.०४ ब.लि. देशी मद्य, १ हजार १६८.२ ब.लि. विदेशी मद्य, ९०७.१७ ब.लि. बिअर आणि १० हजार ६५८.८ ब.लि. ताडी जप्त करण्यात आली.

तसेच ३ लाख ३१ हजार ४९० रिकाम्या बाटल्या, १ लाख ३३ हजार १६० बनावट बुचे, १ लाख ५५ हजार ४०० बनावट लेबल आणि १३ हजार ८०० लिटर स्पिरिट जप्त करण्यात आले. या कारवाईत १८२ वाहने जप्त करण्यात आली असून एकूण १० कोटी २२ लाख ९७ हजार ७५५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

जागा मालकांवरही होणार कारवाई

अवैध मद्यनिर्मिती, विक्री, वाहतूक किंवा मद्य जवळ बाळगण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जागांच्या मालकांनाही संबंधित कारवाईत आरोपी करण्यात येत असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे.

मिथेनॉलयुक्त बनावट दारूमुळे विषबाधा होऊन किडनी निकामी होणे, कायमस्वरूपी अंधत्व येणे आणि अकाली मृत्यू होण्यासारखे गंभीर दुष्परिणाम संभवतात. त्यामुळे नागरिकांनी स्वस्त मद्याच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन विभागाने केले आहे.

अवैध मद्याबाबत येथे तक्रार करा

आपल्या परिसरात अवैध मद्यनिर्मिती, विक्री किंवा वाहतूक सुरू असल्यास तसेच मिथेनॉल, क्लोरल हायड्रेट यांसारख्या पदार्थांची निर्मिती, भेसळ किंवा विक्री होत असल्यास नागरिकांनी तात्काळ माहिती द्यावी.

टोल फ्री क्रमांक : १८००२३३९९९९

व्हॉट्सॲप क्रमांक : ८४२२००११३३

माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे सोलापूरच्या राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक भाग्यश्री पं. जाधव यांनी सांगितले.

या कारवाईत निरीक्षक जे. एन. पाटील, दुय्यम निरीक्षक राम निबाळकर, समाधान शेळके तसेच जवान अनिल पांढरे, चेतन व्हनगुंटी, प्रशांत इंगोले, मंगेश मारसिंग आणि स्वप्निल अरमाळ यांनी सहभाग घेतला.

#Solapur #StateExciseDepartment #GoaLiquor #IllegalLiquor #SolapurNews #Mohol #Ichgaon #MaharashtraNews #ExciseAction #आपलंसत्यअहिल्यानगर


No comments

Note: Only a member of this blog may post a comment.