दुष्काळात फळबागा वाचविण्यासाठी आमदार सुरेश धस आक्रमक; हेक्टरी ६० ते ७५ हजार अनुदानाची मागणी!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; VB-G RAM G योजनेत फळबाग पुनर्जीवनाच्या कामांचा समावेश करण्याची मागणी
मुंबई, प्रतिनिधी : मराठवाडा, विदर्भ आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे फळबागांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या वर्षानुवर्षांच्या मेहनतीने उभ्या राहिलेल्या फळबागा वाचविण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आष्टी-पाटोदा-शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
३ नोव्हेंबर २०२६ रोजी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात धस यांनी दुष्काळग्रस्त भागातील फळबाग उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या आहेत. विशेषतः मराठवाड्यातील आठ जिल्हे, विदर्भातील सहा जिल्हे तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील फळबागांचे संगोपन करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
२८ ऑक्टोबर रोजी मंत्रालय, मुंबई येथे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्यासोबत झालेल्या बैठकीतील चर्चेचा संदर्भ देत त्यांनी ही मागणी केली आहे.
दरमहा चार टँकर पाण्याची गरज
आमदार धस यांनी आपल्या आष्टी मतदारसंघातील पाणीटंचाईचे गांभीर्यही पत्रात अधोरेखित केले आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ५० किलोमीटरच्या परिसरातही पुरेशा पाण्याची उपलब्धता नसल्याची परिस्थिती त्यांनी मांडली आहे. फळबागा जिवंत ठेवण्यासाठी दरमहा किमान चार टँकर, प्रत्येकी २० हजार लिटर क्षमतेचे पाणी उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.
तसेच VB-G RAM G योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबातील सदस्यांना रोजगार उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांना रोजगार मिळेल आणि फळबागांच्या संगोपनासाठीही मदत होईल, असे त्यांनी सुचविले आहे.
हेक्टरी ७५ हजार रुपयांपर्यंत अनुदान द्या
सध्या फळबाग उभारणीसाठी शासनाकडून प्रति हेक्टरी ७.५० लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जात असल्याचा उल्लेख पत्रात आहे. मात्र, सध्याच्या अपवादात्मक दुष्काळी परिस्थितीत अस्तित्वात असलेल्या फळबागा वाचविण्यासाठी किमान १० टक्के म्हणजेच प्रति हेक्टरी ७५ हजार रुपये किंवा किमान ६० हजार रुपये अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या VB-G RAM G योजनेअंतर्गत सध्या ३७५ कामे अनुज्ञेय असल्याचा उल्लेख करत, या कामांच्या यादीत वाढ करून दुष्काळी परिस्थितीत फळबाग पुनर्जीवनाच्या कामांचा समावेश करावा, अशी मागणीही धस यांनी केली आहे. यासाठी केंद्र शासनाकडे योग्य पाठपुरावा करण्याची विनंती त्यांनी केली आहे.
फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?
दुष्काळामुळे फळबागा जिवंत ठेवणे अशक्य झाल्यास मराठवाडा, विदर्भ आणि अहिल्यानगरमधील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याची भीतीही पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ योग्य मदत मिळावी आणि फळबागांचे पुनर्जीवन करण्यासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे.
आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्र शासन या मागणीवर काय निर्णय घेतात, याकडे दुष्काळग्रस्त भागातील फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
#SureshDhas #DevendraFadnavis #फळबागपुनर्जीवन #शेतकरी #दुष्काळ


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.