Breaking News

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! मातोश्री शेत पाणंद रस्त्यांसाठी ११६ कोटींचा निधी वितरित

 


दुष्काळ आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय; प्रलंबित कामांना मिळणार गती

मुंबई, दि. ६ नोव्हेंबर : राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत झालेल्या कामांसाठी राज्य शासनाने पूरक कुशल अनुदानापोटी तब्बल ११६ कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्या निर्देशानुसार हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

दुष्काळी परिस्थिती आणि दिवाळीचा सण लक्षात घेता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, तसेच पाणंद रस्त्यांची प्रलंबित कामे मार्गी लागावीत, यासाठी निधी वितरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री भरत गोगावले यांनी संबंधित यंत्रणेला दिले होते.

शेतमाल वाहतुकीचा मार्ग होणार सुकर

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी बारमाही रस्ते उपलब्ध करून देणे हा आहे. या रस्त्यांमुळे शेतीची मशागत, दैनंदिन शेतीची कामे आणि शेतमालाची बाजारपेठेत वाहतूक करणे अधिक सुलभ होणार आहे.

वितरित करण्यात आलेल्या ११६ कोटी रुपयांच्या निधीमुळे योजनेअंतर्गत झालेल्या कामांचे पूरक कुशल अनुदान उपलब्ध होण्यास मदत होणार असून, उर्वरित कामांनाही गती मिळण्याची अपेक्षा आहे.

शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

पाणंद रस्ते हे ग्रामीण शेती व्यवस्थेतील महत्त्वाचे पायाभूत साधन आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देतानाच ग्रामीण विकासाची कामे थांबू नयेत, या उद्देशाने निधी वितरित करण्यात आला आहे. यापुढेही निधी उपलब्ध होताच तो तातडीने वितरित करण्यात येईल, अशी ग्वाही रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिली. तसेच त्यांनी शेतकऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या.

आपलं सत्य अहिल्यानगर विश्वासार्ह • निष्पक्ष • वेगवान डिजिटल न्यूज

संपादक : रवी कुमार शिंदे

#मातोश्रीशेतपाणंदरस्ते #शेतकरी #भरतगोगावले #रोजगारहमीयोजना #अहिल्यानगर

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.