Breaking News

महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा! एसटीच्या एनसीएमसी कार्डसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय १ जानेवारी २०२७ पर्यंत पुढे ढकलला; जुन्या पद्धतीने प्रवास सवलतींचा लाभ सुरू राहणार

 

मुंबई, दि. ६ नोव्हेंबर २०२६ :


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) महिला आणि ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. एसटीच्या प्रवास सवलतींचा लाभ घेण्यासाठी आवश्यक करण्यात आलेले एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला आता १ जानेवारी २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे कार्ड नसलेल्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनाही ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्वीप्रमाणे प्रवास सवलतींचा लाभ घेता येणार आहे.


परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली.


एसटी महामंडळाने १ ऑक्टोबर २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. आतापर्यंत सुमारे १ कोटी १० लाख कार्डांची नोंदणी व वितरण करण्यात आले आहे. मात्र, ग्रामीण भागातील अनेक महिला लाभार्थ्यांची नोंदणी अद्याप पूर्ण झालेली नसल्याचे निदर्शनास आले.


ग्रामीण भागातील अडचणी, कार्ड नोंदणीची अपूर्ण प्रक्रिया तसेच विविध सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेत्यांकडून करण्यात आलेल्या मागण्यांचा विचार करून महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.


ग्रामपंचायत स्तरावर विशेष नोंदणी शिबिरे


राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत एनसीएमसी कार्ड पोहोचविण्यासाठी एसटी महामंडळाकडून ग्रामपंचायत स्तरावर विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या मोहिमेद्वारे ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत १०० टक्के पात्र लाभार्थ्यांची कार्ड नोंदणी व वितरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.


७ नोव्हेंबरपासून जुन्या पद्धतीने सवलतीचा लाभ


एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय पुढे ढकलल्यामुळे ७ नोव्हेंबर २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड नसतानाही एसटी प्रवास सवलतीचा लाभ घेता येणार आहे.


दरम्यान, या मुदतवाढीच्या कालावधीत सर्व पात्र महिला व ज्येष्ठ नागरिकांनी आपले एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी करून घ्यावे, असे आवाहन एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


या निर्णयामुळे ग्रामीण भागातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, कार्ड नोंदणीसाठी आणखी वेळ उपलब्ध झाला आहे.


— आपलं सत्य अहिल्यानगर

सत्य, विश्वास आणि जनहितासाठी निर्भीड पत्रकारिता.

#आपलं_सत्य_अहिल्यानगर #एसटी_महामंडळ #NCMC_Smart_Card #एनसीएमसी_कार्ड #प्रताप_सरनाईक #महिला_प्रवास_सवलत #ज्येष्ठ_नागरिक #एसटी_प्रवास #महाराष्ट्र_बातम्या #प्रवासी_दिलासा #MSRTC #BreakingNews #MaharashtraNews #AhilyanagarNews #RavikumarShinde

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.