फटाक्यांच्या आतषबाजीमुळे सोलापूर महापालिका बस डेपोला भीषण आग; तीन बसेस जळून खाक, मोठा अनर्थ टळला!
अग्निशमन दलाच्या चार गाड्यांची धाव; शेजारीच पेट्रोल पंप असल्याने दुर्घटनेची भीती
सोलापूर : शहरातील सात रस्ता परिसरातील सोलापूर महानगरपालिका परिवहन विभागाच्या बस डेपोला बुधवार, दि. ११ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत भंगार अवस्थेतील तीन बसेस जळून खाक झाल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तत्परतेने प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले.
प्राथमिक अंदाजानुसार, फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे बस डेपो परिसरातील वाळलेल्या गवताने पेट घेतला असावा आणि त्यातून आग पसरली असावी. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
विशेष म्हणजे, बस डेपोच्या अगदी शेजारीच महानगरपालिकेचा पेट्रोल पंप असल्याने मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, सोलापूर शहर व जिल्ह्यात फटाक्यांमुळे २५ हून अधिक ठिकाणी आगीच्या घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. या परिस्थितीत अग्निशमन दलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दाखवलेली तत्परता व कर्तव्यदक्षता कौतुकास्पद आहे.
अग्निशमन दलाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कार्य अभिनंदनीय असून, नागरिकांनी फटाके फोडताना सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
— पत्रकार रवीकुमार शिंदे आपलं सत्य अहिल्यानगर सत्याच्या शोधात… निर्भीड | निष्पक्ष | विश्वासार्ह
#आपलंसत्यअहिल्यानगर #सोलापूरतडका #सोलापूरबातम्या #SolapurNews #SolapurFire #सोलापूरआग #महापालिकाबसडेपो #बसडेपोआग #अग्निशमनदल #FireBrigade #फटाक्यांचीआतिषबाजी #आगीचीघटना #मोठाअनर्थटळला #महाराष्ट्रबातम्या #MaharashtraNews #पत्रकाररवीकुमारशिंदे #ताज्याबातम्या #BreakingNews #MarathiNews #जनहिताचीबातमी


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.