कुकाण्यात घरातून गांजाची विक्री; स्थानिक गुन्हे शाखेचा छापा!
11 किलो 182 ग्रॅम गांजा जप्त; दोघे आरोपी ताब्यात, 5 लाख 60 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
कुकाणा (ता. नेवासा) : कुकाणा येथील मुलाणीवाडा परिसरात घरातून गांजाची विक्री करणाऱ्या आरोपीवर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली. पोलिसांनी छापा टाकून 11 किलो 182 ग्रॅम गांजा जप्त केला असून, या प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. जप्त केलेल्या गांजासह वजनकाटा व इतर साहित्याची एकूण किंमत 5 लाख 60 हजार 700 रुपये आहे.
19 नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना कुकाणा येथील शाहमद मेहबुब शेख हा स्वतःच्या राहत्या घरातून गांजाची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार नेवासा पोलिसांना लेखी अहवाल देऊन वरिष्ठांच्या आदेशाने पंचांसमक्ष संबंधित घराची झडती घेण्यात आली.
झडतीदरम्यान तीन गोण्यांमध्ये भरून ठेवलेला 11 किलो 182 ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी शाहमद मेहबुब शेख (वय 48, रा. मुलाणीवाडा, कुकाणा) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 5 लाख 59 हजार 100 रुपये किमतीचा गांजा, वजनकाटा, वजनमापे, स्टीलचे भांडे आणि प्लास्टिक पिशव्या असा एकूण 5 लाख 60 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चौकशीदरम्यान सदर गांजा शेवगाव तालुक्यातील मजलेशहर येथील मल्हारी मोहन बोरुडे याच्याकडून खरेदी केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी बोरुडे याचाही शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले.
या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 948/2026 अन्वये एनडीपीएस कायदा 1985 च्या कलम 8(क), 20(ब) व 20(2)(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी ही कारवाई केली.
अवैध अमली पदार्थांच्या विक्रीविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे कुकाणा परिसरात खळबळ उडाली आहे.
— आपलं सत्य अहिल्यानगर
#कुकाणा #नेवासा #गांजाजप्त #अहिल्यानगरपोलीस #स्थानिकगुन्हेशाखा


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.