एसटी चालकाला मारहाण करणाऱ्या गुंडांवर कठोर कारवाई करा!
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुणे ग्रामी
ण पोलिसांना निर्देश
“एसटी कर्मचारी एकटे नाहीत; त्यांच्या सन्मानाला आणि सुरक्षिततेला धक्का पोहोचवणाऱ्यांची गय केली जाणार नाही” – प्रताप सरनाईक
मुंबई, दि. २० नोव्हेंबर २०२६ :
रस्त्यावर हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणावरून कर्तव्य बजावणाऱ्या एसटी चालकाला मारहाण केल्याच्या गंभीर घटनेची परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दखल घेतली आहे. संबंधित हल्लेखोरांवर तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांना दिले आहेत.
या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त करत मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, एसटीचे चालक आणि वाहक ऊन, पाऊस, दिवस-रात्र यांची तमा न बाळगता लाखो प्रवाशांच्या सेवेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावत असतात. अशा कर्मचाऱ्यांना एकटे आणि दुबळे समजून त्यांच्यावर हात उगारणाऱ्या अपप्रवृत्तींनी ही बाब गांभीर्याने लक्षात घ्यावी.
“एसटी कर्मचारी कधीही एकटे नाहीत. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने मी सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. कर्मचाऱ्यांच्या सन्मानाला आणि सुरक्षिततेला बाधा आणणारी कोणतीही गुंडगिरी महामंडळ कदापि खपवून घेणार नाही. अशा घटना घडल्यास संबंधित कर्मचाऱ्यांनी घाबरून न जाता अथवा दबावाखाली न येता तातडीने एसटी महामंडळाच्या मुख्यालयाशी संपर्क साधून आपली बाजू मांडावी. महामंडळाकडून त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
गणवेश परिधान करून शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यावर हात उगारणे ही केवळ मारहाणीची घटना नसून शासकीय यंत्रणेच्या प्रतिष्ठेवर आणि कायद्याच्या अधिकारावर केलेला हल्ला आहे. अशा घटनांमुळे एसटी चालक-वाहकांचे मनोधैर्य खच्ची होते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मंत्री सरनाईक यांनी नमूद केले.
या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून संबंधित आरोपींविरुद्ध मारहाण, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे आणि लागू होणाऱ्या योग्य कायदेशीर कलमांनुसार गुन्हे दाखल करावेत. तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले आहेत.
एसटीचे चालक आणि वाहक हे महामंडळाचे केवळ कर्मचारी नसून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा आहेत. त्यांच्या कर्तव्य बजावण्यात अडथळे आणणाऱ्या, त्यांना धमकावणाऱ्या किंवा मारहाण करणाऱ्या समाजकंटकांना कायद्याचा धाक बसणे गरजेचे आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि त्यांच्या पाठीशी महामंडळ प्रत्येक परिस्थितीत ठामपणे उभे राहील, असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या घटनेच्या निमित्ताने दिला आहे.
#एसटी #प्रतापसरनाईक #एसटीकर्मचारी #पुणेग्रामीणपोलीस #महाराष्ट्र


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.