प्रत्येक पुलासोबत बंधारा; चारा छावण्यांना मंजुरी!
राज्यातील प्रत्येक नवीन पुलासोबत बंधारा बांधणे बंधनकारक; गरजेनुसार चारा छावण्या सुरू होणार!
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या प्रत्येक नवीन पुलासोबत ‘पूल वजा बंधारा’ बांधणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांसह गरज भासेल त्या ठिकाणी तातडीने चारा छावण्या सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
महसूलमंत्री तथा दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत हे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
या बैठकीला जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पशुसंवर्धन व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रत्येक पुलासोबत जलसंधारणाचा उपाय
सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, सिडको, नैना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या पुलांखाली किमान एक मीटर पाणी अडवता येईल, अशी व्यवस्था करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. शक्तीपीठ महामार्गावरही पूल वजा बंधारे उभारण्यात येणार आहेत.
राष्ट्रीय महामार्गांच्या कामासाठी तलावांतील गाळ वापरण्याबाबत आगामी नागपूर अधिवेशनात केंद्र व राज्य सरकारमध्ये सामंजस्य करार करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांसाठी गाळ अनुदान आणि इतर निर्णय
शेतकऱ्यांना मोफत गाळ देण्याच्या योजनेला ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. वनपट्टेधारक व वंचित शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांचे अंतिम अनुदान देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. प्रलंबित फार्मर आयडीसाठी मानक कार्यपद्धती (SOP) जारी करण्यात आली आहे.
रोहयो मजुरी ३७५ रुपये करण्याचा प्रस्ताव
ग्रामीण भागातील मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी रोजगार हमी योजनेची मजुरी ३७५ रुपये करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. तसेच अपूर्ण नळ पाणीपुरवठा योजनांना तातडीने वीज जोडणी देण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.
दुष्काळी परिस्थितीवर दीर्घकालीन उपाययोजना, जलसंधारण, पशुधनासाठी चारा उपलब्धता आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत या बाबींवर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे.
पत्रकार रवीकुमा
र शिंदे
संपादक – आपलं सत्य अहिल्यानगर
Executive Member – AIMA MEDIA
Ahilyanagar District, Maharashtra
All India Media Association
हिंदी मराठी पत्रकार संघ – तालुका संघटक
भारतीय पत्रकार अधिकार – महाराष्ट्र राज्य
#RevenueDepartment #MaharashtraGovernment #DroughtRelief #WaterConservation #BridgeCumBarrage #FodderCamps #FarmerRelief #ChandrashekharBawankule #आपलंसत्यअहिल्यानगर #महाराष्ट्र


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.