Breaking News

विजया रहाटकर यांची अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयाला भेट

महिला आरोग्य सुविधा, स्वच्छता आणि रुग्णसेवेबाबत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर समाधानी!


अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी; गरोदर माता व नवजात बालकांच्या आरोग्य सुविधांचा घेतला आढावा

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर अहिल्यानगर जिल्हा रुग्णालय पाहणी करताना.


बालविवाह रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश; सायबर गुन्ह्यांपासून महिलांनी सतर्क राहण्याचे आवाहन


अहिल्यानगर : राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन विविध विभागांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी महिला आरोग्य सुविधा, प्रसूती सेवा, नवजात बालकांची सुरक्षा, रुग्णालयातील स्वच्छता आणि रुग्णांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेतला. रुग्णालयातील उपलब्ध सुविधा, स्वच्छता आणि रुग्णसेवेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.


पाहणीदरम्यान त्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधून उपचारपद्धती, उपलब्ध सुविधा आणि आरोग्य कर्मचाऱ्यांकडून मिळणाऱ्या सहकार्याची माहिती घेतली. मुलीच्या जन्माचे आनंदाने स्वागत करणाऱ्या कुटुंबीयांचा उत्साह पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला आणि कुटुंबीयांचे कौतुक केले.


यावेळी त्यांनी गरोदर मातांच्या वॉर्डची पाहणी करून वैद्यकीय सेवा, स्वच्छता आणि उपलब्ध सुविधांची माहिती घेतली. गरोदर मातांच्या आरोग्यविषयक नोंदवह्यांची तपासणी केली असता त्यामध्ये अद्ययावत व व्यवस्थित नोंदी असल्याचे निदर्शनास आले. याबद्दल त्यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.


तसेच नवजात बालकांची सुरक्षा, गरोदर मातांची नियमित आरोग्य तपासणी, जोखमीच्या गर्भवतींची ओळख आणि त्यांना वेळेत आवश्यक उपचार उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी प्रशासनाला सूचना दिल्या. जननी सुरक्षा योजना आणि १०२ रुग्णवाहिका सुविधेच्या अंमलबजावणीचाही त्यांनी आढावा घेतला.


बालविवाह रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजनांचे निर्देश


बालविवाहाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याची गरज विजया रहाटकर यांनी व्यक्त केली. बालविवाहामुळे मुलींच्या आरोग्य, शिक्षण आणि भविष्यावर गंभीर परिणाम होतात. त्यामुळे बालविवाह रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, असे त्यांनी सांगितले.


सन २०३० पर्यंत भारत बालविवाहमुक्त करण्याच्या संकल्पाच्या पार्श्वभूमीवर सन २०२६ मध्ये बालविवाहाचे प्रमाण १० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. याबाबत त्यांनी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्याशी चर्चा केली.


सायबर गुन्ह्यांबाबत महिलांनी सतर्क राहावे


डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा गैरवापर करून महिलांची फसवणूक आणि बदनामी करण्याचे प्रकार समोर येत आहेत. ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.


महिलांनी सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांचा वापर करताना सतर्क राहावे. अनोळखी लिंक, संशयास्पद संदेश आणि ऑनलाइन व्यवहारांपासून सावध राहावे. तसेच सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता वाढवावी, असे आवाहन त्यांनी केले.


या पाहणीप्रसंगी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, जिल्हा महिला व बालकल्याण कार्यक्रम अधिकारी संजय कदम, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाबासाहेब नागरगोजे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुचेता यादव, डॉ. सोनल बांगर, डॉ. भारती पेचे, डॉ. संजय वाघ, डॉ. साहेबराव डवरे, डॉ. धनंजय खंडागळे, डॉ. महामुनी, डॉ. राजश्री कटारिया, डॉ. रुपाली कुलकर्णी, डॉ. प्रवीण बोथे यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


जिल्हा रुग्णालयातील विविध विभागांच्या पाहणीनंतर त्यांनी आरोग्य सेवांबाबत समाधान व्यक्त केले. महिलांचे आरोग्य, सुरक्षित प्रसूती, नवजात बालकांचे संरक्षण आणि शासकीय आरोग्य योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी आरोग्य यंत्रणेने अधिक दक्षतेने काम करावे, असे त्यांनी सूचित केले.


---


पत्रकार रवीकुमार शिंदे

संपादक – आपलं सत्य अहिल्यानगर

Executive Member – AIMA MEDIA

Ahilyanagar District, Maharashtra

All India Media Association

हिंदी मराठी पत्रकार संघ – तालुका संघटक

भारतीय पत्रकार अधिकार – महाराष्ट्र राज्य


आपलं सत्य अहिल्यानगर

विश्वसनीय • निष्पक्ष • तेज डिजिटल न्यूज 

#VijayaRahatkar #Ahilyanagar #AhilyanagarNews #DistrictHospital #WomenHealth #WomenEmpowerment #NationalCommissionForWomen #महिलाआरोग्य #विजयारहाटकर #अहिल्यानगर #जिल्हारुग्णालय #बालविवाहप्रतिबंध #सायबरसुरक्षा #आपलंसत्यअहिल्यानगर #पत्रकाररवीकुमारशिंदे


No comments

Note: Only a member of this blog may post a comment.