मा. मंत्री (रोहयो) यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय पंचसंमेलन उत्साहात संपन्न
अहिल्यानगर, दि. १४ : विकसित भारत – रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) (VB-GRAMG) योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आयोजित जिल्हास्तरीय पंचसंमेलन उत्साहात पार पडले. रोजगार हमी योजना मंत्री श्री. भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात ग्रामविकासासाठी सरपंचांची भूमिका अधिक सक्षम करण्यावर विशेष भर देण्यात आला.
यावेळी मंत्री श्री. गोगावले म्हणाले की, "ग्रामपंचायत ही VB-GRAMG योजनेचा केंद्रबिंदू असून सरपंच हा या योजनेचा खरा शिलेदार आहे. गावाच्या गरजांनुसार नियोजन करून शाश्वत विकास साधणे ही प्रत्येक ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे."
पंचसंमेलनात लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांना ‘विकसित भारत – रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) कायदा, २०२५’ (VB-GRAMG Act) संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. जलसंधारण, मृदसंधारण, पाणी साठवण, शेतीपूरक कामे आणि ग्रामीण रोजगार निर्मितीला प्राधान्य देत स्थानिक गरजांनुसार विकासकामांचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले.
प्रशिक्षण सत्रात सहआयुक्त श्री. विवेक घोडके यांनी योजनेतील प्रशासकीय प्रक्रिया, ग्रामविकासासाठी अनुज्ञेय ३१८ प्रकारच्या कामांची माहिती तसेच प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक नियोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या पंचसंमेलनास पालकमंत्री श्री. संजय शिरसाट, आमदार श्रीमती संजना जाधव, आमदार श्री. विलास भुमरे, जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. अविनाश गलांडे पाटील, रोजगार हमी योजना विभागाचे सचिव श्री. अप्पासाहेब धुळाज, आयुक्त श्रीमती अनिता मेश्राम (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी श्री. विनय गौडा जी. सी., मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नू पी. एम., रोहयो विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत स्तरावरील लोकप्रतिनिधी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देतानाच टिकाऊ व उपयुक्त मालमत्ता निर्माण करण्याच्या उद्देशाने VB-GRAMG योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अशा प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रमांना महत्त्व असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
#VBGRAMG
#रोजगारहमी
#ग्रामीणविकास
#पंचसंमेलन
#विकसितभारत


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.