Breaking News

व्ही.बी.-जी राम-जी योजनेअंतर्गत ग्रामविकास आराखड्याला सार्वजनिक विकासकामांचे प्राधान्य; जिल्हास्तरीय पंचसंमेलनात मार्गदर्शन



अहिल्यानगर | प्रतिनिधी

ग्रामीण भागाचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर स्थानिक गरजा, उपलब्ध संसाधने आणि विकासाच्या प्राधान्यक्रमांचा विचार करून सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी केले. व्ही.बी.-जी राम-जी (ग्रामीण) योजनेअंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय पंचसंमेलनात त्यांनी उपस्थित सरपंच, ग्रामरोजगार सेवक आणि अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी ग्रामपंचायत विकास आराखड्यात केवळ वैयक्तिक लाभाच्या कामांऐवजी पाणी, मृद व जलसंधारण, पर्यावरण संवर्धन, सार्वजनिक सुविधा, आपत्ती व्यवस्थापन आणि ग्रामविकासाशी संबंधित सार्वजनिक कामांना अधिक प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या. नियोजनबद्ध विकासातून विकसित ग्रामपंचायती आणि विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यावर भर देण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी (रोहयो) वर्षा पवार यांनी केले. जिल्हा एमआयएस समन्वयक विकास घिगे यांनी व्ही.बी.-जी राम-जी योजनेअंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्याबाबत सविस्तर प्रशिक्षण दिले. यामध्ये योजनेतील ३१८ प्रकारच्या विकासकामांची माहिती आणि प्रभावी नियोजनाची रूपरेषा मांडण्यात आली.

१२५ दिवसांच्या रोजगाराची हमी

योजनेअंतर्गत पूर्वीच्या १०० दिवसांच्या तुलनेत आता १२५ दिवसांच्या रोजगाराची हमी देण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. मृद व जलसंधारण, वृक्षारोपण, सार्वजनिक सुविधा, आपत्ती व्यवस्थापन तसेच विविध वैयक्तिक लाभाच्या कामांचा योजनेत समावेश असून, स्थानिक गरजांनुसार कामांची निवड करण्याचे आवाहन करण्यात आले.

विकसित ग्रामपंचायत आराखड्याचे प्रात्यक्षिक

कार्यक्रमात ग्रामविकास अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष तयार केलेल्या ग्रामपंचायत विकास आराखड्याचे सादरीकरण करून उपलब्ध संसाधने, स्थानिक गरजा आणि विकासाच्या प्राधान्यक्रमांच्या आधारे आराखडा कसा तयार करावा, याचे प्रात्यक्षिक दाखविले.

विशेष मतदार पुनरीक्षणाबाबत माहिती

उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाडे यांनी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेबाबत माहिती दिली. असंकलित मतदारांची (ASDD) यादी जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर तसेच संबंधित मतदान केंद्रांवरील बीएलएंकडे उपलब्ध असून, यादीत नाव असल्यास संबंधित नागरिकांनी १६ ऑगस्ट २०२६ पर्यंत गणना प्रपत्र (Enumeration Form) भरून बीएलओ किंवा तहसील कार्यालयात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक सुभाष सातपुते, रेशीम विकास अधिकारी संदीप आगावणे, नायब तहसीलदार योगेश कुलकर्णी, कृषी अधिकारी लीना टेमगिरे, कार्यक्रम व्यवस्थापक महेश सरोदे तसेच तालुकास्तरीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचा समारोप ग्रामीण विकासात लोकसहभाग, प्रभावी नियोजन आणि उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर यावर भर देत करण्यात आला.


#VBGRamJiYojana

#GramPanchayatDevelopment

#Ahilyanagar

#RuralDevelopment

#MaharashtraNews

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.