Breaking News

श्री शनैश्वर देवस्थान कर्मचाऱ्यांचा संप मागे; विभागीय आयुक्तांचे स्पष्ट निर्देश

 


अहिल्यानगर | दि. ८ सप्टेंबर २०२६

श्री शनैश्वर देवस्थान, शिंगणापूर येथील कर्मचाऱ्यांच्या संभाव्य कामबंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक तयारी केली होती. विभागीय आयुक्त तथा प्रशासक डॉ. प्रवीण गेडाम यांनी अत्यावश्यक सेवा, दर्शन व्यवस्था आणि धार्मिक विधी कोणत्याही परिस्थितीत विस्कळीत होऊ नयेत, यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाला आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत प्रशासन सकारात्मक असून कायदेशीर चौकटीत येणाऱ्या मागण्यांवर योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही डॉ. गेडाम यांनी कामगार संघटना प्रतिनिधी, कार्यकारी अधिकारी आणि विविध विभागांच्या प्रमुखांसोबत झालेल्या बैठकीत दिली. या आवाहनानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन मागे घेतले.

दर्शन, महाप्रसाद आणि सुरक्षेसाठी पर्यायी व्यवस्था

भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी देवस्थान आणि जिल्हा प्रशासनाने समन्वयाने पर्यायी व्यवस्था उभारावी, असे निर्देश देण्यात आले. सुरक्षा, स्वच्छता, गर्दी नियंत्रण, पाणीपुरवठा आणि आपत्कालीन व्यवस्थापन सुरळीत ठेवण्यासाठी महसूल, पोलीस, ग्रामविकास आणि इतर शासकीय विभागांची मदत घेण्याचे नियोजन करण्यात आले.

श्री शनिदेवांचे मुख्य दर्शन, महाप्रसाद तसेच इतर आवश्यक धार्मिक व्यवस्था सुरळीत सुरू राहण्यासाठी पर्यायी मनुष्यबळ उपलब्ध ठेवण्याचेही निर्देश प्रशासनाला देण्यात आले.

सुमारे १५० अधिकारी-कर्मचाऱ्यांची सेवा अधिग्रहीत

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून विविध शासकीय विभागांतील सुमारे १५० अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सेवा देवस्थानच्या व्यवस्थेसाठी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. यामध्ये होमगार्ड, महसूल विभाग आणि ग्रामविकास विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

मंदिर परिसर तसेच वाहनतळ परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

आरोग्य विमा आणि रजा नियमांबाबत प्रशासनाची भूमिका

वेतनश्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या आरोग्य विम्याचा हप्ता भरण्याचा निर्णय यापूर्वीच मान्य करण्यात आला आहे. त्यामुळे तूर्त पूर्व विश्वस्तांच्या कालावधीप्रमाणे विमा व्यवस्था सुरू ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

कर्मचाऱ्यांच्या सेवा व रजा नियमांचा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून शासनाचा निर्णय होईपर्यंत इतर शासकीय आस्थापनांप्रमाणे रजा देण्याची कार्यवाही केली जाणार आहे.

बोनस, वेतन फरक आणि पदोन्नतीच्या मागण्यांवर चर्चा

कर्मचाऱ्यांचा थकीत दिवाळी बोनस, ५० टक्के वेतन फरक, अतिरिक्त कामाचा मेहनताना आणि कालबद्ध पदोन्नती या मागण्यांचा संबंध देवस्थान कायद्यातील कलम २७ शी असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्ट (शिंगणापूर) कायदा, २०१८ मधील कलम २७(२) नुसार व्यवस्थापन निधीसाठी देवस्थानच्या मागील वर्षाच्या एकूण वार्षिक उत्पन्नाच्या कमाल १० टक्के रकमेची वैधानिक मर्यादा आहे. त्यातूनच पगार व आस्थापना खर्च करण्याची तरतूद असल्याचे प्रशासनाने सांगितले.

प्रशासनाच्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये देवस्थानचे उत्पन्न ४८ कोटी २९ लाख रुपये, तर वेतन व बोनसवरील प्रत्यक्ष खर्च २५ कोटी ८२ लाख रुपये झाला. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उत्पन्न ६१ कोटी ४५ लाख रुपये, तर पगारावरील खर्च १७ कोटी ४३ लाख रुपये झाल्याचे सांगण्यात आले.

मानधनावरील कर्मचाऱ्यांचा खर्च धरल्यास हा खर्च आणखी वाढत असल्याची माहिती प्रशासनाने दिली. या आर्थिक मर्यादा, प्रत्यक्ष खर्च आणि सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणाबाबत राज्य शासनाकडे सविस्तर माहिती सादर करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

पूर्व विश्वस्तांच्या निर्णयांमुळे अतिरिक्त आर्थिक भार?

प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, तत्कालीन पूर्व विश्वस्तांच्या कार्यकाळात झालेल्या कथित गैरप्रकारांमुळे २२ सप्टेंबर २०२५ रोजी पूर्व विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले होते. त्या काळात घेतलेल्या काही निर्णयांमुळे देवस्थानवर अतिरिक्त आर्थिक भार निर्माण झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. संबंधित बाबींवर कायदेशीर मार्गाने तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.

प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद; आंदोलन मागे

देवस्थान कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारू नये, असे आवाहन डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले.

या आवाहनाला प्रतिसाद देत संबंधित कामगार संघटनांनी मंगळवारी सायंकाळी उशिरा निवेदन देऊन प्रस्तावित कामबंद आंदोलन मागे घेतल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे श्री शनैश्वर देवस्थानातील दर्शन, धार्मिक विधी आणि अत्यावश्यक सेवा सुरळीत राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पत्रकार रवीकुमार शिंदे | आपलं सत्य अहिल्यानगर



#शनैश्वरदेवस्थान #शिंगणापूर #अहिल्यानगर #कर्मचारीआंदोलन #प्रवीणगेडाम


No comments

Note: Only a member of this blog may post a comment.